अहिल्यानगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची बदली झालेली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करतांना त्यांनी कमी कालावधीत प्रशासनावर पकड निर्माण केली होती. गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत नगर जिल्हा परिषदेत काम करताना येरेकर यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या काळात जलजीवन ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी पाणी योजना राबवण्यात आली आहे.
या जलजीवन योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी झालेल्या आहेत. या तक्रारींची चौकशीची मागणी खासदार नीलेश लंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी केलेली आहे.
या अगोदरही येरेकर यांची दोनदा बदली झालेली आहे. त्यांनी ते बदलीचे आदेश रद्द करून आणले होते. मात्र आता त्यांना हजर व्हावेच लागेल, अशीच चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. येरेकर यांची अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. आता ते जिल्हाधिकारी पदाचा पदभार कधी घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकांना अधिकाऱ्यांसह कर्मचारी कंटाळलेले होते. त्यामुळे रोजच अधिकारी व कर्मचार्यांना घरी जाण्यास उशीर होत होता. उशिरापर्यंत चाललणाऱ्या बैठकांना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात नेहमीच झडत होती. त्यामुळे सीओंची बदली कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Post a Comment