पाथर्डी : तालुक्यातील फुंदेटाकळी गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडली. बाबासाहेब त्रिबंक फुंदे (वय ५५), धंदा-शेती, रा. फुंदेटाकळी, यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ जून २०२५ रोजी सकाळी ते त्यांच्या मुलीकडे नातवाला भेटण्यासाठी अहिल्यानगरला गेले होते.
दरम्यान त्यांच्या पत्नी सिंधुबाई व मुलगा नारायण शेतात खुरपणीसाठी गेले होते. दुपारी ३.२५ वाजता नारायण घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्याने त्याने घरात पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले.
लोखंडी पेटीचे कुलूप तुटलेले होते. पेटीतील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेले होते. ६ तोळे सोन्याचे पोती, ११ व ५ ग्रॅमचे झुंबर, दोन सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या नथी, व १४ भार चांदीचे कडे असा मध्यमाल चोरी गेला आहे.
फुंदेटाकळी व परिसरात चोरट्यांनी चोरीसाठी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या काही दिवसांत घरांसोबतच दुकानेही चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत.
भरदिवसा बंद घरे व रात्रीच्या सुमारास दुकाने फोडून समान, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरल्या जात आहेत. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Post a Comment