दरवाजा तोडून चोरी... दागिने लांबविले... एकावर कुर्हाडीने हल्ला...

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील वाघ वस्तीवर चार चोरट्यांनी घरफोडी केली. चोरांनी घराचा मुख्य दरवाजा उघडून घरात झोपलेल्या जोडप्याला बांबूने मारहाण करत महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले. 


यावेळी चोरट्यांना प्रतिकार करत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात चोरांनी कुऱ्हाड मारली यात ते गंभीर जखमी झाले. दत्तात्रय नामदेव वाघ (वय ६९) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची पत्नी अलका दत्तात्रय वाघ या मारहाण किरकोळ जखमी झाल्या. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अलका वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  

फिर्यादीत म्हटले आहे की चांडगाव येथील वाघ वस्तीवरील दत्तात्रय नामदेव वाघ हे काम उरकून मध्यरात्री बाराच्या सुमारास घरी येऊन झोपले. शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचे दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. 

दत्तात्रय वाघ यांच्या पत्नी अलका वाघ यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील व कानातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्याच दरम्यान अलका या मोठ्याने ओरडल्याने दत्तात्रय वाघ यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी वाघ यांना बांबूने मारण्यास सुरुवात केली. 

त्यावेळी वाघ यांनी चोरट्यांना जोरदार प्रतिकार केल्याने त्यातील एका चोरट्याने वाघ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या घटनेनंतर तेथे गोंधळ सुरू झाल्याने चोरट्यांनी तिथून पलायन केले. कुऱ्हाडीने वार झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय वाघ यांना उपचारासाठी श्रीगोंदा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक गणेश उगले, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक आनंद सोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाने घटना स्थळापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत माग काढला तिथून दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post