अहिल्यानगरमध्ये आढळले कोरोना रुग्ण...

अहिल्यानगर :  जिल्ह्यातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून यातील एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसर्‍याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. 


नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण अत्यावस्थेत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक 405 रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत 467 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

राज्यात आतापर्यंत एकूण 7 मृत्यू कोरोनाने झालेले आहेत.  हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या. 

कोरोनाचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नगरमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

तसेच मनपाने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे अ‍ॅन्टीजेन चाचणीच्या 400 किटची मागणी केली असून ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्याठिकाणी त्यांच्या संपर्कात असणार्यांना शोधून गंभीर लक्षणे नसणार्यांना घरातच ठेवण्यात येणार आहे, तर गंभीर लक्षणे असणार्‍यांवर आरोग्य संस्थेत उपचार करण्यात येणार आहे. 

जिल्हा रुग्णालय प्रशासन वाढत्या कोरोनावर लक्ष ठेवून असून जिल्हा रुग्णालयात कोरोनाची आरटीपीसी चाचणी सुरू करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post