अहिल्यानगर : शनिशिंगणापूर, जवखेडे, अक्कलकोट येथे झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
तसेच राज्यातही लोकप्रतिनिर्धीकडून मुस्लिम, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्याक समाजाला उद्देशून अपशब्द व आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. या सर्व प्रकरणांचा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना देण्यात आले.
शुक्रवारी (ता. २७ ) दुपारी मोठ्या संख्येने मुस्लिम युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून संविधान विरोधी सुरू असलेल्या कृत्यांचा जोरदार निषेध नोंदवला. समाजात जातीय द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाबद्दल उद्देशून आक्षेपार्ह बोलले जात आहे.
नुकतेच शनिशिंगणापूर येथे काम करणाऱ्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला कामावरून काढून टाकण्यासाठी आंदोलन केले व आक्षेपार्ह संबोधले. तसेच सोलापूर अक्कलकोट येवेही मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले.
मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर कब्जा करण्यासाठी सतत प्रशासनावर दबाव वापरला जात आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजाच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह भाषण केले जात आहे.
अशा कृत्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठी जातीय दंगल घडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाविरोधात भडकाऊ भाषण करणे, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मालकी जागांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करणे, मुस्लिम धार्मिक स्थळ आणि कब्रस्तान यांच्यावर कारवाई करण्याचे एकीकडे प्रशासनाला निवेदन देणे आणि दुसरीकडे एका विशिष्ट जातीच्या लोकांना व जातीयवादी संघटनेला मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचे आवाहन करणे, असे प्रकार सुरु आहेत.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा महानगरपालिका आयुक्त कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment