संगमनेर : वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याची कारवाई टाळण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना संगमनेर तालुक्यातील कनोली येथील तलाठी संतोष बाबासाहेब शेलार (वय ४०) याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, सोमवारी (दि.७) केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, ग्रामपंचायत शिवारात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यात आलेली आहे. सदर वाळू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर वाळू वाहतुकीसाठी यातील तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाहने यांना संगमनेर तहसीलदार संगमनेर यांनी मंजुरी दिलेली आहे.
तक्रारदार व त्यांचे मित्र हे त्यांच्या ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करण्याचे कामकाज करीत असताना तक्रारदार व त्यांचे मित्र तसेच इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाळू वाहतूक करायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याबाबत कारवाई करेल.
त्यानंतर सदरची कारवाई टाळायची असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून लाचेची मागणी करीत दोन पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडअंति पंचवीस हजार रुपये लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती कळवली.
या विभागाने सोमवारी तलाठी शेलार यांच्यावर सापळा रचला. यात शेलार याला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत उशिरापर्यंत संगमनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
Post a Comment