शिक्षक आक्रमक... माईक अन् लाईट बंद केल्याचा आरोप...

मुंबई : विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. 


मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागण्यासाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आले. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला पोलिसांनी आंदोलन स्थळाचा माईक आणि लाईट बंद केल्याचा आरोप केला जात आहे. 

आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली. माझा भाऊ अर्थमंत्री असला तरी सगळे निर्णय फडणवीस घेतात असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांविरोधात घोषणाबाजी केली. 

राज्यातील सुमारे 5,000 खासगी विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2024 मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. 

मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यामध्ये सध्या 5,844 अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये 820 प्राथमिक, 1,984 माध्यमिक व 3,040 उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण 3,513 प्राथमिक, 2,380 माध्यमिक व 3,043 उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. 

एकूण 8,602 प्राथमिक शिक्षक, 24,028 माध्यमिक शिक्षक आणि 16,932 उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.

विविध मागण्यासाठी 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जात आहे. यावर जर तोडगा निघाला नाही तर शरद पवार हे बुधवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.

कॉन्ट्रॅक्टरसाठी सरकारकडे पैसा आहे. 85000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही त्याला शेतकरी विरोध करताय. 85000 खर्च करुन कशाला रोड बनवता त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे रोहित पवार म्हणाले. 

शिक्षकांसाठी जो जीआर काढला हजार कोटीचा तोच द्या. शिक्षकांसाठी द्यायला सरकारकडे पैसा नाही. कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे. इलेक्शनमध्ये मतदान केलं आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असे रोहित पवार म्हणाले. उद्या असा जीआर काढा त्यासाठी शिक्षक वर्ग वाट पाहत आहेत असे रोहित पवार म्हणाले. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post