विषारी वायूने एकाचा मृत्यू...

संगमनेर शहरानजीकच्या कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी असलेल्या भूमिगत गटारात स्वच्छता करीत असताना ही घटना घडली. या घटनेत रियाज जावेद पिंजारी याची प्रकृती चिंताजनक आहे. 


त्याच्यावर शहरातील कुठे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर बचाव कार्यासाठी धावून गेलेले माजी सैनिक प्रकाश वसंत कोटकर हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे. गटार स्वच्छता कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका कर्मचाऱ्याला गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 

त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कर्मचाऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला गेला. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या गंभीर दुर्घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामातील सुरक्षा उपाययोजनांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिगत गटार कामादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा कामगारांना पुरवण्यात आल्या होत्या का ? तसेच इतरही सर्व सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले होते का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

या  दुर्घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post