मुंबई :शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १४ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
दोन नंबर कोर्टात ही सुनावणी होणार आहे. १४ तारखेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सूचिबद्ध झाल्याने आता दीड वर्षांनंतर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता लागलेली आहे. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते. त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उबाठा गटाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात निकाल देताना अजितदादा पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह वापरताना त्याची जाहीरात करण्याचे बंधन कोर्टाने घातले होते. अंतिम सुनावणीच्या अधिन तात्पुरते हे चिन्ह वापरण्यास दिले आहे अशी स्पष्ट कबुली अजितदादांना वर्तमान पत्रात करावी लागली होती.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात सूर्याकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्याच खंडपीठासमोर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी होणार आहे.
Post a Comment