पारनेर : पुणे-अहिल्यानगर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. या मार्गासाठी खासदार नीलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता.
या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल.
सध्या दौंडमार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाची प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत खासदार नीलेश लंके यांनी निवडणुकीनंतर लगेच संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता.
अहवालानुसार या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टिकोनातूनही तो फायदेशीर राहील, असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे.
प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतूद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे. हा रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून, नगर ते पुणेदरम्यान ११ स्थानकांचा त्यात समावेश आहे.
त्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुणे-वाघोली-शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव, शिरूर, सुपा, चास-केडगाव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वे स्थानकाशी जोडला जाणार आहे.
Post a Comment