शेवगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील मध्यवस्तीतील एका घरामध्ये घुसून दहा ते बारा चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यास जबरी मारहाण करत तब्बल चार लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लुटून नेला. यात चोरट्याने वृद्ध महिलेचा कान तोडून दागिने ओरबाडले. मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री ही घटना घडली.
बालमटाकळी येथील मध्यवस्तीतील पेठेत राहणाऱ्या हिरालाल धोंडलकर (वय ७५) यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून दहा ते बारा चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी हिरालाल धोंडलकर यांना मारहाण केली.
तसेच त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर (वय ७०) यांनाही चोरट्यांनी तोंडाला चिकटटेप लावून लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले.
कानातील दागिने ओरबाडताना कानाला गंभीर दुखापत झाली. वृद्ध दाम्पत्यास जबरी मारहाण करून अंदाजे ४ तोळे दागिने लुटत चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील पांडुरंग पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानाकडे वळविला.
स्टेशनरी दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यामधील अंदाजे ३ हजारांची रोख रक्कम, १५ हजारांचे बेन्टेक्स दागिने व २० हजारांचे इतर दागिने घेऊन चोरटे तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी खेडकर, प्रवीण महाले, बाजीराव सानप, गुप्तवार्ताचे भगवान सानप, सचिन अंधारे, पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ गर्कळ, देविदास तांदळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान जागीच घुटमळत राहिले.
Post a Comment