नेवासा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र कर्मभूमी नेवास्यात आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात “पैस” खांबाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसर व गावात विठ्ठलनामाच्या गजरांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
या दिवशी पहाटेच्या वेळी ज्ञानेश्वरी पारायणासाठी नाशिकहून आलेल्या वारकरी भाविकांच्या हस्ते “पैस” खांबास पंचामृत, चंदन, उटी अर्पण करून वेद मंत्रांच्या गजरात अभिषेक करण्यात आला. हा पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण सोहळा उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधान देणारा ठरला.
दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी रांग लागली होती. या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी सेवेकरी गोरख भराट, यांच्यासह हभप बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सेवेत कार्यरत होते. त्यांनी दर्शन रांगा, पाणी, माहिती यासाठी विशेष सहकार्य केले.
संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात करविनी निवासिनी ग्रुपच्या महिला भाविकांनी टाळ-मृदंगाच्या निनादात “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात रिंगण सादर केले. या भक्तिरसपूर्ण सोहळ्यात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. त्यांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून टाकला.
याशिवाय पंचक्रोशीतील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नेवासात हजेरी लावली. वारकऱ्यांनी वारी परंपरेनुसार टाळ, मृदंग आणि हरिपाठाच्या माध्यमातून आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती केली. त्यामुळे संपूर्ण नेवासा परिसर एकदिवसीय वारीचा अनुभव देणारा ठरला.
मंदिर परिसरात विविध प्रकारची पूजावस्तू, खाद्यपदार्थ व खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेसारखे वातावरण तयार झाले होते. नेवासा शहरातील संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री मोहिनीराज मंदिर यासारख्या अन्य देवस्थानांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
या पर्वानिमित्ताने नेवासा येथील वकिल मंडळींनी देखील "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या जयघोषात सुसज्ज दिंडी काढली. ही दिंडी संत ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. नगरमध्ये प्रवेश करताच भाविकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.
Post a Comment