अहिल्यानगर ः मोहरमच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने हद्दपार बाबत आदेश जारी केले होते. मात्र, या आदेशाचा भंग करणाऱ्या दोन इसमांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात गस्त घालत असताना दोघा हद्दपार गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
सलमान मेहबूब खान (वय ३१, रा. कोठला, घासगल्ली) हा इसम ३० एप्रिल २०२५ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात आला आहे.
मात्र, तो परवानगी शिवाय गुलशन डेअरीजवळ, कोठला परिसरात फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने अहिल्यानगर जिल्ह्यात येण्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे कबूल केले.
दुसऱ्या कारवाईत असद गफार शेख (वय ३५, रा. मुकुंदनगर, दर्गा दायरा रस्ता) यास ९ एप्रिल २०२५ रोजी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो विनापरवाना राज चेंबर जवळ, कोठला स्टैंड परिसरात फिरताना आढळून आला. त्यालाही पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
Post a Comment