नगर तालुका : चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. बुधवारी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे विक्रम राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सदस्य बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के, सभापती प्रवीण कोकाटे, बाबासाहेब गुंजाळ, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, डॉ. मारुती ससे, आबासाहेब कोकाटे, प्रकाश पोटे, अत्तार खान, मतीन सय्यद आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या निवेदनाद्वारे सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. 22 ऑगस्ट 2025 रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण व बोगस अर्जांच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले.
गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेची अतिक्रमण नोटीस, ना हद्द निश्चिती, ना कोणतेही ठोस पुरावे होते, तरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
त्यानंतर 19 सप्टेंबर 2025 रोजी पोलिस उपविभागीय अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग, अहिल्यानगर यांच्याकडून पवार यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली. 24 सप्टेंबर 2025 रोजी या संदर्भात सुनावणी निश्चित करण्यात आली होती.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, शरद पवार यांनी मागील 10 वर्षांत ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच पदावर कार्य केले असून समाजकारणात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी बाजार समिती, पंचायत समिती निवडणुका लढवून शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न आंदोलनातून शासन दरबारी मांडले.
त्यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी राजकीय दबाव टाकून अधिकारीमार्फत ही बोगस कारवाई घडवून आणली आहे. सत्ताधारी व प्रशासन खऱ्या शेतकरी समस्यांकडे (अतिवृष्टी, आत्महत्या, शेतीचे नुकसान) दुर्लक्ष करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे सदर दोन्ही कारवाया त्वरित मागे घ्याव्यात, तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणारे बोगस गुन्हे व कारवाया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात सात ते आठ दिवसापासून सर्वत्र मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामध्ये विशेषतः नगर, पारनेर, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी आदी तालुक्यांमध्ये मुसळधार व सतत धार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रकल्प व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाल्यांच्या काठावरील शेतीला अक्षरश: तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पाणी साचले असून, पीक पूर्णता पाण्याखाली गेले आहे.
ओढे-नाळे भरून वाहत असून, वाड्या वस्तींना जोडणारे छोट-मोठे पूल वाहून गेले आहेत. जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दळणवळणाचा प्रश्न बिकट बनला आहे.
या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थ हतबल झाले असून, उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
Post a Comment