अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

अहिल्यानगर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २६ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १५,३८५ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक, प्रवरा नदीवरील ओझर बंधारा १,१५६ क्युसेक, मुळा धरणातून १,२०० क्युसेक, घोड धरणातून ५,००० क्युसेक, सीना धरणातून ४,६०४ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ६५० क्युसेक, खैरी धरण येथून ९२२ इतका विसर्ग सुरू आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post