अहिल्यानगर : नगर तालुक्यातील विळद गावात गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्याच्या वावराने खळबळ उडवून दिली आहे. बिबट्या थेट लोकवस्तीच्या सीमेलगत दिसू लागल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गावाचे सरपंच संजय बाचकर यांनी वन विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे.
गावातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, बिबट्याने रात्रीच्या वेळेस तसेच सकाळी लवकर अनेक वेळा पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. विशेषतः मेंढ्या, शेळ्या, कुत्री अशा प्राण्यांना बिबट्याचा बळी पडावा लागला आहे. एका शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार, “आमच्या दोन शेळ्या एका रात्रीत बिबट्याने उचलल्या. यामुळे हजारो रुपयांचं नुकसान झालं.
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे गावात अघोषित संचारबंदीचं वातावरण आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. महिलांना शेतात जाणं, लहान मुलांना शाळेत पाठवणं आणि वृद्धांना बाहेर फिरणंही धोकादायक वाटू लागलं आहे. ग्रामस्थांनी सांगितलं की, “आता शाळेची बस थांबते तिथपर्यंत सोबत जायचं लागते. लहान मुलांना एकटं सोडणं शक्यच नाही.
या गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधत ग्रामपंचायत विळदचे सरपंच श्री. संजय बाचकर यांनी वन विभागाला दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक अधिकृत पत्र दिलं. त्यामध्ये त्यांनी बिबट्याच्या वावरामुळे गावात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाची सविस्तर माहिती दिली आहे. पत्रात पुढील उपाययोजनांची विनंती करण्यात आली आहे:
बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढवणे, गावकऱ्यांमध्ये बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करणे.
सरपंच संजय बाचकर म्हणाले, “बिबट्याचा वावर गावासाठी जीवघेणा ठरत आहे. आतापर्यंत सुदैवाने कोणतीही मानवी हानी झाली नाही, पण याला वेळेवर लगाम घातला नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते. आम्ही वन विभागाकडे तातडीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांची मागणी आहे की वन विभागाने वेळ न घालवता लगेच पिंजरे लावावे, गस्त वाढवावी आणि स्थानिकांना मार्गदर्शन करावे. अशा घटनांमध्ये उशीर झाल्यास मानवी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकऱ्यांनीही आपल्या सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहावं, असं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे.

Post a Comment