अहिल्यनगर : जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, या परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकेच विद्यार्थ्यांना न मिळाल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. या परीक्षेच्या नावाखाली काही संस्थांकडून पालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचेही समोर आले असून, त्यामुळे पालकवर्गामध्ये तीव्र मंथन सुरू आहे.
राज्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी नोंदणी करण्यास सांगितले असून, त्यासाठी विशेष पुस्तके विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु ही पुस्तके बाजारात उपलब्ध नाही. जे परीक्षा आयोजित करतात. त्यांच्याकडेच ही पुस्तके उपलब्ध आहे. तेही जादा दराने विक्री होत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे संबंधित आयोजकांनी परीक्षेसाठी व पुस्तके वितरण करण्यासाठी पगारी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. ही यंत्रणा संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थी परीक्षेला बसविण्यासाठी संबंधितांना कमिशन देत असल्याची चर्चा आहे. परीक्षा शुल्कसह पुस्तकांची पैसे घेत आहे. परंतु पुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत देत नाहीत. त्यामुळे परीक्षेची तयारी कशी करायची? यावर सध्या पालकांमध्ये मंथन सुरू आे.
या परिस्थितीत अनेक पालक परीक्षेच्या हेतूबाबतच प्रश्न विचारत आहेत. “नवोदय व शिष्यवृत्तीच्या धर्तीवर परीक्षा घेतली जाते म्हणतात, पण शासनाने अधिकृतपणे काही सूचना दिलेल्या नसल्याची चर्चा आहे. राज्यातील काही शिक्षणाधिकार्यांनी या परीक्षेला सहकार्य न करण्याचा आदेश दिलेला आहे अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
शिक्षण विभागाकडे या संदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याचे शाळा मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. काही शाळा स्वतःच्या पातळीवर हा उपक्रम राबवित असून, त्यामुळे नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, पालक संघटनांनीही या विषयात पुढाकार घेतला असून, “परीक्षेच्या नावाखाली होत असलेली आर्थिक लूट तात्काळ थांबवावी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके मोफत उपलब्ध करून द्यावीत,” अशी मागणी शिक्षण विभगाकडे केली आहे.
तथापि, शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, पुढील काही दिवसांत याबाबत तक्रारींचा सूर आणखी चढण्याची शक्यता आहे.
.jpeg)
Post a Comment