संगमनेर ः संगमनेर नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलत आहेत, गट-उपगटांची हालचाल वाढत आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी विविध पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन चालविलेला संपर्क अभियान हा निवडणुकीतील प्रमुख चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
आमदार खताळ हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध प्रभागांत घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रत्येक घराच्या दारात थांबून मतदारांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा आणि नाराजी शांतपणे ऐकण्याची त्यांची शैली मतदारांना भावत आहे. नगरपालिकेच्या कामकाजातील त्रुटी आणि होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेची त्यांनी जवळून जाण घेतली आहे.
मोठमोठे रस्त्यावरील कार्यक्रम, जाहीर सभा आणि सोशल मीडियावरील आक्रमक प्रचार यांच्या तुलनेत घरदार संपर्क हा राजकारणातील सर्वात परिणामकारक आणि विश्वासार्ह मार्ग मानला जातो. अमोल खताळ यांचा हा “डोअर-टू-डोअर” संवाद मतदारांमध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
या संवादात पाणीपुरवठा, रस्त्यांची विकासकामे, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शहरातील स्वच्छता, तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक तातडीच्या प्रश्नांना आमदार खताळ यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्याचे नागरिक सांगतात.
अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केलेला निर्धार विशेष चर्चेत आहे. त्यांच्या मते, संगमनेरच्या विकासाला गती देण्यासाठी शिवसेनेचे प्रशासन आवश्यक आहे. त्यामुळे यावेळी काही झाले तरी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा, हा माझा आणि कार्यकर्त्यांचा चंग आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. शहरातील अनेक विभागात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेला बळ मिळताना दिसत आहे.
घरोघरी भेट देणार्या नेत्याला मतदार नेहमीच मोकळेपणाने प्रश्न विचारतात. काही ठिकाणी नागरिकांनी अडचणींचा जाब विचारला, तर अनेक ठिकाणी स्वागत करत सुचनाही केल्या. खताळ हे प्रत्येक प्रतिक्रियेला महत्त्व देत असून त्यातून स्थानिक गरज ओळखून काम करण्याची मानसिकता दिसत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता जाणवत आहे.
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत या वेळेस अनिश्चितता अधिक आहे. राष्ट्रीय पक्षांचे कमी झालेले अस्तित्व, स्थानिक आघाड्यांचे बळावलेले समीकरण आणि अपक्षांची मोठी संख्या – या सर्वांमुळे लढत अधिक रोमांचक झाली आहे. अशा परिस्थितीत आमदार खताळांचा थेट संपर्क दौरा शिवसेनेला बळकटी देणारा ठरू शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
शेवटी, नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे निवडणूकच ठरवेल; परंतु धूळफेक, सोशल मीडिया प्रचार आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन ऐकण्याची पद्धत हीच खरी लोकशाहीची ओळख आहे, आणि ती अमोल खताळ यांनी सध्या अंगीकारली आहे.


Post a Comment