शिर्डी : येथील नगरपालिका निवडणुकीची लगबग वाढत असून नगराध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
भाग्यश्री सावकारे (शिवसेना – उद्धव ठाकरे गट), अनिता आरणे (अपक्ष), जयश्री थोरात (भाजप – महायुती), माधुरी शेजवळ (काँग्रेस), मेघना खंडीझोड (अपक्ष), सायली मोरे (अपक्ष) आणि कल्याणी आरणे (शिर्डी स्वाभिमानी आघाडी – पुरोहित गट) अशी या पदासाठी सात उमेदवारांमध्ये चुरस दिसत आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी आरणे यांच्या प्रचाराला सध्या चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मतदारसंघातील भेटीगाठी, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि संघटनात्मक पातळीवरील हालचाली यामुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात मात्र काहीशी चिंतेची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. जयश्री थोरात या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी स्थानिक समीकरणांमुळे निवडणूक अधिकच कठीण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, इतर सर्व उमेदवारही आपल्या पद्धतीने प्रचारात जोर लावत असून अंतिम टप्प्यात ही शर्यत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. शिर्डीतील नागरिक कोणाला कौल देतात हे आगामी घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.

Post a Comment