अहिल्यानगर : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींनी यापूर्वी नगरपालिकेत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, याही वेळी त्यांना संधी मिळेल, अशा चर्चेला उधाण आले होते. मात्र उमेदवारी जाहीर होताच “ज्येष्ठांना पुन्हा डावलले” असा आरोप पुढे येऊ लागला आहे.
मागील एका निवडणुकीत ज्या पद्धतीने अनुभवी नेत्यांना बाजूला ठेवण्यात आले होते, त्याच पद्धतीचा पायंडा यंदाच्या निवडणुकीतही पाळला गेल्याने ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीला डावल्याने तीव्र नाराजी उसळली आहे.
त्या व्यक्तीने अनेक वर्षे मेहनत घेतली, स्थानिक विकासकामांत पुढाकार घेतला, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे त्यांना यंदा संधी दिली जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. पण पक्षाने पुन्हा नव्या चेहऱ्याला दिल्याने नाराजीत अधिक भर पडली आहे.
स्थानिक पातळीवर “ज्येष्ठांनी काम केले, पण संधी मात्र दुसऱ्यांला; आता मतदारच योग्य धडा शिकवतील” अशी चर्चा सुरू आहे. काही मतदारांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त करत, मतदानातूनच प्रत्युत्तर देऊ असा इशाराही दिला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नगरपालिकेतील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चिततेने भरलेली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष नेतृत्वालाही स्थानिक पातळीवरील असंतोषाची जाणीव होऊ लागली असून, हा रोष मतदानाच्या टक्केवारीत स्पष्टपणे दिसून येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
ज्येष्ठांना पुन्हा नाकारल्यामुळे निर्माण झालेला असंतोष निवडणुकीचे वातावरण तापवणार, हे निश्चित झाले आहे.

Post a Comment