नेवासा : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीकडून नगराध्यक्षपदासाठी डॉ. करणसिंह घुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने निवडणुकीतील वातावरणाचे तापमान आणखी वाढले आहे. युतीच्या पॅनलचे भवितव्य आता घुले यांच्या नेतृत्वावर अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
युतीतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास या उमेदवारीनंतर वाढल्याचे दिसत असले तरी, विधानसभा निवडणुकीनंतरच्या काही घडामोडींमुळे मतदारांमध्ये नाराजीचे सावट असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषतः “आमदार विठ्ठलराव लंघे” यांनी नेवासा शहरातील प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने विकासकामे रखडली अशी भावना नागरिकांमध्ये पसरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे युतीसमोर या नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
डॉ. घुले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर युतीने प्रचारयंत्रणा गतीमान करण्यास सुरुवात केली आहे. घरदारी कार्यक्रम, सोशल मीडिया मोहिमा या माध्यमातून घुले यांची प्रतिमा भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आरोग्य क्षेत्रातील त्यांचे कार्य, तरुण नेतृत्व आणि त्यांची संघटन कौशल्ये यांचा प्रचारात मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे.
नेवासा तालुक्यातील अपेक्षित विकासकामांना गती मिळाली नाही, शासनस्तरावरील काही निर्णयांमध्ये नेवासाचा आवाज पुरेसा पोहोचला नाही आणि स्थानिक प्रश्नांकडे पुरेशे लक्ष दिले गेले नाही, अशी तक्रार नागरिक व्यक्त करत आहेत.
यामुळे निवडणुकीत युतीला बचावात्मक भूमिका घ्यावी लागणार का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
विरोधकांनी ही नाराजी भांडवल करून प्रचाराची दिशा ठरवली आहे. “नेवासा मागे पडले, विकासाचे आश्वासन हवेतच राहिले” अशा मुद्द्यांवरून सत्ताधारी युतीवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे घुले यांना सकारात्मक प्रचारासोबतच नाराजीचा वेध घेऊन त्यावर तोडगा मांडावा लागणार आहे.
डॉ. करणसिंह घुले यांच्या उमेदवारीनंतर युतीत नवचैतन्य निर्माण झाले असले तरी मतदारांचा मूड ओळखणे आणि नाराजी दूर करणे हीच निवडणुकीतील खरी किल्ली ठरणार आहे. आगामी दिवसांत नेवासा नगरपंचायत निवडणूक आणखी रंगतदार होणार यात शंकाच नाही.

Post a Comment