कर्जत : येथील समाज प्रबोधन संस्थेतर्फे दरवर्षी प्रजासत्ताकदिनी कर्जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार समर्थ माध्यमिक विद्यालय, कर्जत येथील सहशिक्षक मधुकर बरबडे यांना सहकुटुंब सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून कर्जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समर्थ विद्यालयाचे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन स्नेहप्रेम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष फारुक बेग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कर्जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्जतचे प्रथितयश उद्योजक प्रशांतजी ढेरे होते.
समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून हा पुरस्कार आदर्श शिक्षकांना दिला जातो. कर्जत येथील आदर्श शिक्षक हनुमंतराव विठ्ठलराव सरडे यांच्या गौरवार्थ हा पुरस्कार तालुक्यातील आदर्श शिक्षकास दरवर्षी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
या पुरस्कारासाठी यावेळी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथील ज्येष्ठ शिक्षक मधुकर बरबडे यांची निवड करण्यात आली होती. यावेळी मधुकर बरबडे यांना सहकुटुंब हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, शिक्षक हा समाज घडविणारा आहे. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनी आदर्श निर्माण केल्यास येणारी पिढी ही आदर्शवत असेल. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे प्रकाश धांडे, हिरामण येळपणेकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
सत्कारास उत्तर देताना मधुकर बरबडे म्हणाले, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझे जबाबदारी वाढवणारा आहे. माझा हा पुरस्कार मी माझ्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना समर्पित करतो व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो ते म्हणजे चांगल्या विचारांवर वाईट विचारांचा प्रभाव कधीच पडू देऊ नका, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमप्रसंगी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव राऊत, समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जतचे प्राचार्य चंद्रकांत राऊत, स्नेहप्रेम सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष फारुक बेग, चंद्रभामा महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य रामकृष्ण ढेरे, डॉ. संतराम सूर्यवंशी, पत्रकार गणेश जेवरे तसेच आदर्श शिक्षक मधुकर बरबडे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका उषा काळदाते यांनी तर दीपक लांगोरे यांनी आभार मानले.

Post a Comment