नेवासा : नेवासा नगरपंचायतीत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाद निर्माण झाला असून, उपनगराध्यक्ष सौ. सुखदान यांनी थेट नगरपंचायत आवारातून आपला कारभार सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
आज मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्ष सुखदान यांच्या दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीबाबतच्या सूचना प्रशासनाला २२ जानेवारी २०२६ रोजीच देण्यात आल्या होत्या.
मात्र, उपनगराध्यक्ष व नगरसेवक कार्यालयात उपस्थित झाल्यानंतर उपनगराध्यक्षांच्या दालनाची कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच बैठकीसाठी बोलावण्यात आलेले संबंधित अधिकारी व कर्मचारीही गैरहजर होते. विशेष म्हणजे, नगराध्यक्षांचे दालन मात्र पूर्णतः स्वच्छ करण्यात आलेले होते.
या प्रकारामुळे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष सौ. सुखदान यांनी केला आहे. प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या घटनेनंतर उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन तात्पुरती आसन व्यवस्था करून बैठक घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जोपर्यंत नेवासा नगरपंचायत प्रशासनाकडून संपूर्ण प्रशासकीय इमारतीची स्वच्छता केली जात नाही तसेच बैठकीस अनुपस्थित व निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपनगराध्यक्ष आपला कारभार नगरपंचायत आवारातूनच चालवणार असल्याचे उपनगराध्यक्ष सौ. सुखदान यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment