गडाखांवर आरोप; मतदारांकडून बियाण्यांचा प्रतिहल्ला..

अहिल्यानगर  :  मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतु राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापू लागले आहे. विरोधी गटाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर विविध मुद्द्यांवर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे या आरोपांचे पडसाद आता समाजमाध्यमांवरही उमटू लागले असून विविध पोस्ट, व्हिडीओ आणि संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कामकाजापासून विकासाच्या मुद्द्यांपर्यंत अनेक विषय चर्चेत आहेत. मात्र सध्या मतदारांमध्ये आणि समाजमाध्यमांवर सर्वाधिक चर्चा होत आहे ती ‘बियाण्या’च्या मुद्द्याची. निवडणुकीशी थेट संबंध नसलेल्या या विषयाने अचानक  प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या पोस्टला उत्तर देताना समर्थकांकडून ‘बियाण्या’संदर्भातील पोस्ट टाकल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे  केंद्रबिंदू विकास, कारखान्याचे भविष्य आणि सभासदांचे प्रश्न यापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टयुद्धाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही गटांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात असून मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रकारचे संदेश प्रसारित केले जात आहेत. काही पोस्टमध्ये राजकीय टोलेबाजी, तर काही ठिकाणी उपरोधिक भाषेचा वापर करून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार अधिकच रंगतदार बनला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, सहकारी क्षेत्रातील निवडणुकांमध्ये पूर्वी सभांमधून आणि प्रत्यक्ष भेटींमधून प्रचार होत असे. मात्र आता सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र बनले असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मुळा कारखान्याच्या निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मतदारांमध्येही या पोस्टची चर्चा रंगू लागली असून आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना ‘बियाण्या’चा मुद्दा पुढे आणला जात असल्याने प्रचारात वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरील हे पोस्टयुद्ध निवडणुकीच्या निकालावर कितपत परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post