सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत कारखान्यावरील सत्ता कायम राखली. यापूर्वी २१ पैकी १७ जागा बिनविरोध जिंकल्यानंतर उर्वरित चारही जागांवर सहकार पॅनलच्या उमेदवारांनी सुमारे सहा हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विरोधी पॅनलचा पराभव केला.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर विरोधी पॅनलकडून सर्व जागांवर लढत देण्याचे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सर्व जागांवर उमेदवार उभे करता न आल्याने केवळ चार जागांवरच निवडणूक झाली. या चारही जागांवर मतदारांनी सहकार पॅनलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.
करजगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमक यांना ६,८९५ तर ज्ञानेश्वर रामराव दरंदले यांना ६,७२५ मते मिळाली. विरोधी उमेदवार नारायण डौले यांना ८४७ आणि किरण जाधव यांना १,०४१ मते मिळाली.
महिला राखीव मतदारसंघात कमल चांगदेव दहिफळे यांनी ७,४०१ तर विमल नारायण सोनवणे यांनी ७,१८२ मते मिळवत विजय संपादन केला. विरोधी उमेदवार मीराबाई दिवटे यांना १,००० मते मिळाली.
यापूर्वी सोनई, घोडेगाव, खरवंडी, नेवासा, प्रवरासंगम आणि विविध प्रवर्गांतील एकूण १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीपूर्वीच सहकार पॅनलने आघाडी घेतली होती.
निकालानंतर कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी हा विजय माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावरील सभासदांचा विश्वास असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले असले तरी मतदारांनी मतदानातून स्पष्ट भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला.
या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत विरोधी मतांमध्ये झालेली घट. यंदाच्या निवडणुकीत विरोधी पॅनलला अपेक्षित पाठिंबा मिळाला नसल्याची चर्चा सभासदांमध्ये होती.
या निकालामुळे मुळा सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलची एकहाती सत्ता कायम राहिली आहे.
दहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा विरोधी पॅनलच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाल्याची चर्चा निकालानंतर रंगली. या निवडणुकीत सभासदांनी सहकार पॅनलच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे चित्र दिसून आले.

Post a Comment