नगरपंचायतीची बदनामी करणाऱ्या कथित चॅनेलवर बंदी आणा... तोतया पत्रकारावर कारवाईची मागणी; नगरसेवकांचे पोलिसांना निवेदन, चौकशीचीही मागणी

नेवासा : नेवासा नगरपंचायतीविरोधात सोशल मीडियावर सातत्याने कथितपणे तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून नगरपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत संबंधित कथित न्यूज चॅनेलवर तातडीने बंदी घालावी आणि चॅनेलचा पत्रकार म्हणून वावरणाऱ्या या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी नेवासा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामुळे शहरासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.


याबाबत नगरसेवक डॉ. मनीषाताई वाघ, मेघाताई सरकाळे, अनिल पवार आणि अंकुश म्हस्के यांनी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले की, नेवासा शहरात कार्यरत असलेल्या एका सोशल मीडिया न्यूज चॅनेलकडून गेल्या काही दिवसांपासून नेवासा नगरपंचायतीला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. या चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या बातम्या कथितपणे तथ्यहीन, पूर्वग्रहदूषित आणि बनावट असून, केवळ प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने भडक मथळ्यांचा वापर करून त्या सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, नगरपंचायतीची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगरसेवकांनी पुढे असा दावा केला आहे की, संबंधित चॅनेलकडे शासन किंवा माहिती व प्रसारण मंत्रालयाची आवश्यक वैध परवानगी नसून ते बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. तसेच या चॅनेलच्या नावाखाली पत्रकार म्हणून वावरणाऱ्या काही व्यक्तींना कोणतीही अधिकृत पत्रकार मान्यता किंवा वैध ओळख नसतानाही ते पत्रकार असल्याचे भासवून शासकीय संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित चॅनेल व वेबसाईटवर आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची सखोल पडताळणी करण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

या निवेदनानंतर संबंधित प्रकरणात पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते, तसेच चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे नेवासा शहरातील नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांच्या निवेदनावर पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते, तसेच संबंधित डिजिटल चॅनेलबाबत  कारवाई सुरू होते का, याबाबत उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post