मुन्ना पठाण
कर्जत : स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत सुरू असलेल्या श्रमदान अभियानानंतर आता अनेक व्यक्ती, संघटना या अभियानाचा एक भाग होत आहेत. स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी कर्जतकरांची धडपड सुरू आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत कर्जत नगरपंचायतने या अभियानात भाग घेतला आहे. महात्मा गांधी जयंतीपासून आजतागायत कर्जत येथील विविध सामाजिक संघटना व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी गेली १४० दिवस अखंड श्रमदानाची मशाल पेटत ठेवली आहे. सुरवातीला मोजके असलेल्या हातांना अनेकांची साथ मिळाली आहे.
हजारोच्या संख्येने हे हात रोज श्रमदानासाठी राबत आहेत. सर्व जाती धर्माबरोबरच विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,आजी माजी सैनिक, व्यापारी, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पत्रकार,लहान बालगोपालांचाही सहभाग आहे.
आता या अभियानातून अनेकजण प्रभावित होऊन आपापल्या परीने पुढे येत आहेत. कर्जत शहरातील प्रभातनगर येथील रहिवाशी आणि तेथीलच पिंपळवाडी येथील कलाशिक्षक सुनील भोसले यांनी पुढे येऊन प्रभातनगर परिसरातील भिंतीवर स्वछता संदेश देऊन अभियानाचा दुसरा भाग बनले आहेत.
सुनील भोसले हे स्वतः रोज श्रमदानातही अगदी हिरारीने सहभागी असतात. परंतु त्यांनी त्यांच्यातील कलेचा उपयोगही या अभिनयासाठी करण्याचा निश्चय केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
त्यांनी रेखाटलेल्या संदेशाने कर्जतमधील अनेक भिंती आता स्वच्छतेचा संदेश देऊ लागल्या आहेत.
पुढचे पाठ मागचे सपाट या म्हणीचा प्रत्येकाला जीवनात कधी तरी अनुभव येत असतो. स्वच्छता मोहिमा राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या आहे. त्यात या म्हणीचा प्रत्यय अनेकांना आलेला आहे.
मात्र कर्जतकरांना मात्र भोसले यांच्यामुळे असा अनुभव अशक्यच आहे. स्वच्छता मोहिम झाल्यानंतर भिंतीवर रेखाटण्यात येणार्या संदेशामुळे स्वच्छतेचे महत्व टिकून राहिलेले आहे. या संदेशातून प्रत्येकाला स्वच्छता ठेवण्यासाठी स्वच्छता दूत दारात उभा असल्याचा भास होत आहे.
(क्रमश:)


Post a Comment