नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या मागील दीड वर्षापासून गाजत असलेल्या घड्याळ खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी याकरिता प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ व संतोष खामकर यांनी जिल्हा उपनिबधकांकडे सातत्याने मागणी केली होती. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षक बॅंकेतील घड्याळ घोटाळ्याची कलम ८३ अंतर्गत चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.
जागृत सभासदांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ व्यवहाराच्या चौकशीकरिता रावसाहेब खेडकर सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) श्रीगोंदा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली होती.
घड्याळ घोटाळा चौकशी कामी चौकशी अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान बँकेच्या संचालक मंडळाने आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने अत्यंत नियोजनपूर्वक अतिशय चुकीच्या पद्धतीने कसा व्यवहार केला. याचे तक्रारदरांनी सबळ पुराव्यानिशी संबंधित कागदपत्रे समोर ठेवून या व्यवहारातील अनियमितता व अपहाराचे न्यायिक पुरावे सादर केलेले होते.
घड्याळ घोटाळ्याच्या व्यवहारात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, अनियमितता आणि अपहार झालेला असल्या कारणाने बँकेच्या सभासदांनीही या चौकशीच्या मागणीकरिता आंदोलने केलेली होती.
शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या तक्रारदारांनी घड्याळ खरेदी व्यवहारातील अनियमितता आणि अपहारची तसेच शिक्षक बँकेच्या माहे एप्रिल 2019 ते ३० सप्टेंबर २०२० अखेर पर्यंतच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमित व्यवहाराच्या फेरहिशोब तपासणी करण्याची तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशी करून आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेबाबत कलम ८८अंतर्गत जबाबदारी निश्चिती करण्याची आणि संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी प्राधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली होती.
घड्याळ खरेदी व्यवहार अनियमितता आणि अपहारची चौकशी प्रक्रिया पूर्ण करून चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर साहेब, सहाय्यक निबंधक(सहकारी संस्था) यांनी नुकताच अंतिम चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेला होता.
या चौकशी अहवालात घड्याळ घोटाळा व्यवहारातील अनियमिततेवर चौकशी मध्ये ठपका ठेवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशी करण्याबाबत शिफारस केलेली होती. या अनुषंगाने अखेर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ घोटाळ्याच्या व्यवहाराची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम ८३ अंतर्गत चौकशी करून दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक चौकशी अहवालात १४ लाख १६०० रुपयांचे आर्थिक नुकसान बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेले आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. ही रक्कम मोठी असल्यामुळे बँकेची कलम ८३ अंतर्गत चौकशी करून जबाबदार संचालक मंडळाकडून वसूली करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
पुढील चौकशी कामी अँड. श्रीराम वाघ यांची सक्षम प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाचे प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ, संतोष खामकर यांनी दिली आहे.
शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाने केलेले घंटानाद आंदोलन त्याचप्रमाणे विकास डावखरे, गणेश वाघ, संतोष खामकर यांनी सातत्याने केलेल्या चिवट पाठपुराव्यामुळे रुपये चौदा लाख एक हजार सहाशे एव्हढा सभासदांचा पर्यायाने बँकेच्या पैस्यांची लूट वसूल करण्यासाठी बँकेची कलम ८३ ची चौकशी लागली आहे. चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्यापुढे जवळ जवळ एक वर्ष चौकशी प्रक्रिया चालली. यामध्ये संचालक मंडळास दोषी धरुन पुढील चौकशी करण्याबाबत आदेश दिला आहे. जोपर्यंत सभासदाच्या घामाचा व कष्टाचा पैसा दोषींकडून वसूल होत नाही, तोपर्यंत आम्ही सत्यासाठी लढाई लढत राहू.-
प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद
Post a Comment