अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र म्हणून आढळगावची
ओळख आहे. या आरोग्य केंद्रात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे.
पण आज बुधवार (दि-12) ला गावातील एका माजी पदाधिकाऱ्याने गोंधळ घातल्याने लसीकरणाचा फज्जा उडाला.
सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
करण्याचा कार्यक्रम चालू आहे. अशाच प्रकारे आढळगाव येथे प्राथमिक आरोग्य
केंद्रात दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू होते. आज या केंद्रात 200 लस उपलब्ध
झालेल्या होत्या. या लसीचे दुपारच्या सत्रापर्यंत व्यवस्थित लसीकरण चालू
होते. दुपारी तीन वाजता प्रांताधिकाऱ्यांनी आढळगाव आरोग्य केंद्राला
भेट दिली. तेथील कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर गावातील एका माजी पदाधिकाऱ्याने आरोग्य केंद्रात आले. त्यांनी आमच्या
नातेवाईकांना अगोदर लस द्या, असे म्हणून गोंधळ घातला. या ठिकाणी असणाऱ्या आशा
सेविका व सुरक्षारक्षक यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे हे लसीकरण काही काळ
ठप्प झाले होते. पण अशा स्वयंघोषीत पुढार्यांमुळे सर्वसामान्य लोक लसीकरणापासून वंचित राहत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे गाेंधळ घालणार्या गावपुढाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.
काही स्वयंघोषीत पुढारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. आज लसीकरणात जो गोंधळ घातला आहे. तो निषेधार्थ आहे. अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेवर दबाव आणणार्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे.
- उत्तम राऊत, सदस्य, ग्रामपंचायत, आढळगाव
Post a Comment