नगर ः ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत आजच सर्व आरोग्य केंद्रांना आदेशित करण्यात येत आहे. शिक्षकांनी आपापल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटरची निर्मिती करण्यात येणार अाहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी दिली.
जिल्ह्यातील वाढत्या
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी
संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आयोजित केली
होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी जगन्नाथ भोर, इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील
प्राथमिक शिक्षक कोरोनाशी संबंधित सर्व कामे करीत आहेत. त्यांना लस
घेण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रांवर मज्जाव करण्यात येत असल्याची बाब शिक्षक
संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून
दिली. जिल्ह्यामध्ये शिक्षक घरोघरी जाऊन कोरोना बाधितांचा सर्वे करीत आहेत,
कोविड सेंटरवर ड्युटी करीत आहेत. पोलिसांना सहकार्य करीत असून इतरही सर्व
कामे करीत आहेत.
मागील दीड महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त शिक्षकांना आपले
प्राण गमवावे लागले आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नाचे
गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी जिल्ह्यातील
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करून
घेण्याबाबत आदेशित करणारे पत्र आजच काढण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानुसार
हे पत्र सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राने दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व
प्राथमिक शिक्षकांनी आपापल्या भागातील आरोग्य केंद्रावर जाऊन पहिला किंवा
दुसरा डोस लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील कर्मचारी सुद्धा यात बाधित होत आहेत.
त्यांनासुद्धा उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा
परिषदेच्या सर्व खात्यांच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र
कोविड सेंटर लवकरच उभारले जाणार आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी
सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सुरुवातीला नगरमध्ये एक व नंतर
उत्तरेत एक असे दोन सेंटर उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी
शिक्षक संघटनांतर्फे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रामुख्याने मुद्दे
मांडण्यात आले. या बैठकीत बापूसाहेब
तांबे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप,
मच्छिंद्र लोखंडे, विजय महामुनी, भाऊसाहेब नगरे, सुनील शिंदे, गौतम मिसाळ,
सुभाष कराळे, विकास साळुंखे, एकनाथ ढाकणे, कुंडलिक भगत, एकनाथ राउत आदी शिक्षक संघटनांसह इतरसही संघटनांचे
प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिक्षकांच्या
लसीकरणाबाबत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा
अवलंब करण्यात येत असल्याने शिक्षक वर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती.
आजच्या बैठकीत सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखांनी मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांकडे याबाबत हरकती नोंदविल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रश्नी दखल
घेऊन सर्व शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सर्व आरोग्य
केंद्रांना आदेशित करण्याचे मान्य केल्याने जिल्ह्यातील शिक्षक वर्गात
समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment