नगर-पुणे राज्य महामार्गावर घडले माणुसकीचे दर्शन...


नगर : कोरोनाच्या काळात माणुसकी संपली आहे... आजारी असलेल्या कोणी मदत करीत नाही... या फक्त वावड्या आहेत... आजही माणुसकी शिल्लक आहे... त्यामुळेच जगाचे रहाडगाडे सुरळीत सुरु आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळातही माणसं एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड आहेत... उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आरोग्यविभागासह इतरही विभाग झटत आहेत.. अशाच विभागाच्या जोडीला काहीजण झटत असले तरी ते पडद्यासमोर येत नाही... अशा दोन तरुणांनी केलेल्या चित्रपटातील एखाद्या प्रसंगासारखाच प्रसंग नगरमध्ये घडला आहे.... त्या विषयी थोडक्यात...

कोरोनाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवणारे अनेक प्रसंग घडत आहेत. काही जगासमोर येत आहेत... तर काही तसेच राहत आहेत... दोन दिवसांपूर्वी नगर शहराला मान्सपूर्व पावसाने झोडपून काढले. या पावसाने शहरासह परिसर जलमय झाला होता. अशा पावसात रस्त्यावरून तुरळकच वाहतूक सुरु होती. 

अचानक नगर पुणे राज्य महामार्गावरील जुने बजाज शोरूम येथे एक रुग्णवाहिका येऊन बंद पडली. या रुग्णवाहिकेतील रुग्ण अत्यावस्थ होता. रुग्णवाहिकेचा चालक रुग्णवाहिका सुरु करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. 

रुग्णवाहिकेतील रुग्णाला रुग्णालयात कसे पोहचायचे हा प्रश्न चालकाला पडला होता. भरपावसात तो प्रयत्न करत होता. याच परिसरात पावसापासून बचाव व्हावा म्हणून आडोशाला बसलेल्या अजहर सय्यद व जावेद शेख या दोन तरुणांच्या ही बाब लक्षात आले.  

हे दोघेही रुग्णवाहिकेजवळ पोहचले. त्यांनी चालकाला काय झाले म्हणून विचारले. रुग्णवाहिकेतील रुग्ण अत्यावस्थ असून रुग्णालयात पोहचणे गरजेचे आहे. परंतु रुग्णवाहिका चालूच होईना आता पोहचायचे कसे हा प्रश्न असल्याचे सांगितले.  

अजहर सय्यद व  जावेद शेख पावसाचा विचार न करता रुग्णवाहिकेला धक्का देण्यास सुरवात केली. सुमारे एक किलोमीटर धक्का देत त्यांनी रुग्णवाहिकेला रुग्णालयापर्यंत पोहचवले. 

या त्यांच्या कामगिरीमुळे रुग्णाला जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या काळात कोणी कोणाला विचारत नाही, आजारी माणसाला मदत करीत नाही... या फक्त वावड्या आहेत. आजही समाजात माणुसकी जीवंत आहे. 

हे अजहर सय्यद व जावेद शेख यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखा हा प्रसंग होता. त्यामुळे प्रत्यक्ष नगर पुणे रस्त्यावरील हे हिरोच होते. त्यांच्या या कामगिरीला सलाम... या घटनेमुळे निश्चितच इतरांनाही प्रेरणा मिळण्यास मदत होईल, हे नक्की.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post