नगर: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रोज चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. दैनंदिन २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसांत होत आहेत. त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजून वाढविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज (गुरुवारी) तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना व त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. मात्र, अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात होणाऱ्या चाचण्यांची संख्या कमी आहे.
याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. केवळ सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या होणाऱ्या अँटीजेन चाचणी व्यतिरिक्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी किंवा बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी चाचण्या होणे आवश्यक आहे.
सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.
Post a Comment