वडनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अहमदनगर व अहमदनगर जिल्हा प्राथ शिक्षक गुरुमाऊली मंडळ आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलन बुधवार (दि. 26) मे ला रात्री आठ ते दहा या कालावधीत होत आहे.
या काव्यसंमेलनात प्रतिथयश कवी निमंत्रित म्हणून सहभागी असल्याने रंगतदार होणाऱ्या या काव्यसंमेलनात दर्जेदार काव्यसरींची मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध कवयित्री रचना मॅडम या कविसंमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आहेत. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. कमर सरूर, हनुमंत येवले, शांताराम खामकर,गीतांजली वाबळे, चेतन बोडेकर, मनिषा पाटील हे प्रतिथयश साहित्यिक या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागी होत आहेत.
बाळासाहेब शिंगोटे व गीतांजली वाबळे हे कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रसिद्ध साहित्यिक संजय पठाडे, कारभारी बाबर, गणेश भोसले यांचे विशेष सहकार्य या संमेलनासाठी लाभत आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या हस्ते या संमेलनाचे ऑनलाईन उदघाटन होणार आहे. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष गोकूळ कळमकर यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्युल्लता आढाव या संमेलनाचे नियोजन करत आहे.
जिल्ह्यातील साहित्य रसिकांना झूम मिटिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या कविसंमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाकडून करण्यात आले आहे.
सर्वचजण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानसिक दडपणाखाली असल्याने त्या मानसिकतेतून थोडे बाहेर पडता यावे, म्हणून कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.
Post a Comment