संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पठार येथे अंगावर वीज कोसळून महिलेसह चार शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वनवे ( वय ४० ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
यास चक्रीवादळाचा आतापर्यंत सर्वात जास्त तडाखा पश्चिम बंगाल व ओडिशाला बसला आहे. या यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आगामी तीन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली होती. ती खरी ठरली आहे.
शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. हिवरगाव पठार परिसरात शेळ्या चारत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच चार शेळ्याही वीज पडल्याने मृत्यूमुखी पडल्या आहेत.
हिवरगावसह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून काही ठिकणी झाडे पडली आहे. वादळी वार्यासह पाऊस असल्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
Post a Comment