वडनेर : वडनेर (ता. पारनेर) येथील बाबरमळा या वॉर्डात आठवडाभरात येथील पदाधिकार्यांच्या मागणीवरून दुसर्यांदा कोरोना अँटीजन रॅपिड टेस्टचे शिबिर घेण्यात आले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. त्याचाच भाग म्हणून गावोगावी कुटुंब सर्व्हे, कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग, समुपदेशन, विलगीकरण, गावातील उपकेंद्र आरोग्य केंद्रांवरील कोरोनाच्या मोठया प्रमाणात तपासण्या, लसीकरण मोहिम या बाबी सुरू आहे.
प्रत्येक गावच्या कोरोना दक्षता समिती या बाबींकडे लक्ष देऊन काम करत आहे. आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर हे सर्व कर्मचारी युद्धपातळीवर काम करतानाचे चित्र दिसून येत आहे.
वडनेरमधील बाबरमळा या वॉर्डातील जगदाळेवस्ती या छोट्याशा वस्तीवर मागील आठवड्यात तर बाबरमळा येथे सोमवार (31 मे)ला कोरोनाच्या तपासणीकरिता डॉ.प्रवीण नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. छोट्याशा वस्तीवर जाऊन घेतलेल्या कॅम्पमुळे येथील अनेकांची रॅपिड टेस्ट तपासणी करण्यात आली.
जगदाळेवस्ती येथे एकूण 57 जण व बाबरमळा येथे 43 जणांची टेस्ट करण्यात आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. छोट्याशा वस्तीवर असे कॅम्प राबवायला सुरुवात झाल्याने कोरोनाची लढाई आपण लवकरच जिंकू, असे मत निलेश लंके प्रतिष्ठानचे निघोज गण प्रमुख सुनील बाबर यांनी व्यक्त केले.
वडनेरच्या प्रत्येक वस्तीवर जाऊन तपासणीचे असे कॅम्प घेण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वडनेर उपकेंद्राचे डॉ. प्रविण नरसाळे यांनी केले आहे.
आरोग्यसेविका रईसा शेख, आशा वर्कर विद्या भालेकर, अंगणवाडी सेविका पूनम गजरे, मुख्याध्यापक राजू इनामदार, शिक्षक बाळासाहेब दिघे यांचे या कॅम्पसाठी परिश्रम घेतले या कॅम्पसाठी ग्रामपंचायत सदस्या शैलाताई जगदाळे, मनिषा बाबर, राहुल बाबर, संजय जगदाळे, नारायण बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब साळवे, नीलेश लंके प्रतिष्ठान मुंबई पदाधिकारी अंकुश बाबर, पोपट जगदाळे, प्रकाश जगदाळे, ऋषिकेश जगदाळे, सचिन जगदाळे, रविंद्र बाबर, सचिन बाबर, साई बाबर यांनी विशेष सहकार्य लाभले.
वाड्या वस्त्यांवर कोरोना रॅपिड टेस्ट कॅम्प वडनेर उपकेंद्राच्या वतीने राबविण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही अत्यंत महत्त्वाची बाब असून येथील आरोग्य विभागाचे काम जागरुकतेचे व इतरांसाठी मार्गदर्शक असेच आहे. लवकरच वडनेर सर्वांच्या योग्य दक्षतेने कोरोनामुक्त होईल. रात्रंदिवस राबणाऱ्या आरोग्य विभाग, आशा वर्कर, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे या काळातील कार्य कौतुकास्पद असेच राहिले आहे.
सुनील बाबर, आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान निघोज गण प्रमुख
Post a Comment