आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप मराठा समाजाबरोबर... माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन....


पाथर्डी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप मराठा समाजाच्या सर्व संघटनांबरोबर आहे. महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका अजूनही दाखल केली नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी विठोबा राजे मंगल कार्यालयात निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. 

यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अथक प्रयत्नानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात ते मान्य करण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाचे सादरीकरण प्रभावीपणे करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले. 

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले.स्वतःचे अपयश झाकण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे. 

नव्या घटना दुरुस्ती नुसार राज्य शासनाला आरक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हावेत, असे विखे यांनी स्पष्ट केले. 

आमदार राजळे म्हणाल्या, ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेत मराठा आरक्षणा संदर्भात राज्यातील पहिली बैठक शेवगाव व पाथर्डी येथे केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा हक्क असून इतर समाजावर अन्याय होणार नाही. याची दक्षता घेतली जावी. सर्व पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील मात्र आरक्षण हाच एक पक्ष ठेवून आगामी काळात वाटचाल करावी लागेल. 

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी. यासाठी शासन दरबारी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. 

मराठा आरक्षणाचा विषय श्रेयवादाचा नाही. आरक्षणासंदर्भात समाजामध्ये पसरलेली शांतता वादळापूर्वीची शांतता ठरू नये.

दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने विखे- राजळे गटात दुरावा वाढला होता.विखे गटाचे अभय आव्हाड यांनी राजळे गटाला सोडचिठ्ठी दिली. आव्हाड यांचे ही काही समर्थक राजळे गटात दाखल झाले. 

या सर्व घडामोडींनी तालुक्याचे राजकारण ढवळून निघत असताना विखे यांनी आंदोलनाच्या बैठकांची सुरुवात शेवगाव - पाथर्डी मतदार संघातून करत दौऱ्यात आमदार मोनिका राजळे यांना सामावून घेतले.  

शेवगावच्या बैठकीनंतर विखे यांनी कासार पिंपळगाव येथे राजळे यांच्या निवासस्थानी भोजन करत आरक्षणासह अन्य मुद्यांवर चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे व निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डीच्या बैठकीत भाषण करताना आमदार राजळे यांनीही विखे यांना आंदोलनाच्या प्रश्नी जिल्ह्याचे नेतृत्व जाहीर करत त्यांच्या पुढाकारावर शिक्कामोर्तब केले.

विखे- राजळे यांची पुन्हा राजकीय जवळीक चर्चेचा विषय ठरली. यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान विखे-राजळे यांच्या लंच डिप्लोमसी नंतर पक्षाला तालुक्यात अच्छे दिन आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले तर आभार रविंद्र वायकर यांनी मानले. 

एका कार्यकर्त्याने भाषणातून मराठा समाजाचे नेते एकत्र नाहीत. म्हणून आरक्षण मिळत नाही. कार्यक्रमाच्या जाहिरातीत मोठ्या नेत्यांचे फोटो असतात. त्यात आमदार राजळे यांचा फोटो नसतो ,असे सांगताच आमदार राजळे यांनी हस्तक्षेप करत मराठा आरक्षणाशिवाय कोणत्याही मुद्द्यावर बोलू नये, अशी समज देत बैठकीचे राजकीय वळण थांबवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post