श्रीगाेंदा ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपल्याला यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. अतिशय वेगाने ही लाट आली. ऑक्सीजन पुरवठा, लसीकरण, औषध उपलब्धता आदीबाबत नव्याने नियोजन करण्यास या लाटेने भाग पाडल्याचे ते म्हणाले.
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन आणि पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन आता प्रशासन म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे. जी अत्यावश्यक पूर्वकाळजी आहे, ती घेतली गेली पाहिजे. जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सीजन उपलब्धता, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन व तयारी आतापासूनच केली जात आहे. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत.
आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता देण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रापैकी एक असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानची मोठी मदत या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असलेला ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment