नगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहाजणांची टोळी कोतवाली पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रासह दोन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव येथील एका हॉटेलजवळ केली.
कोतवाली पोलिसांची हद्दीत गस्त सुरू असताना नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल सचिनजवळ अंधारात काही व्यक्ती संशयितरित्या वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यांची नावे सोनू सुधाकर भालेराव (रा. पंचशीलनगर, रेल्वे स्टेशन, अहमदनगर), अनुज सुधाकर उमाप (रा. ताराबाग कॉलनी, केडगाव), रोहन सत्यवान शिंदे (रेल्वे स्टेशन), कुणाल सुधाकर भालेराव (रा. पंचशील नगर, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) यांच्यासह दोन अल्पवयीन मुले (रा. केडगाव) यांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, लोखंडी गज, मिरची पूड तसेच दोन मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहेत.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हेमंत भंगाळे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Post a Comment