सरकारी योजनेवर आमदारांची जाहिरात... शिव भोजन केंद्रांवर आमदारांचे फोटो


नगर : राज्य सरकारने गरिबांसाठी शिवभोजन केंद्र सुरू करून चांगला निर्णय घेतला आहे या शिवभोजन केंद्रांचा गरिबांना चांगलाच फायदा होत आहे. मात्र या शिवभोजन केंद्रांवर आता आमदार व इतर नेत्यांची छायाचित्र चिकटवले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने गरिबांसाठी स्वस्तात जेवन देण्यासाठी शिवभोजन केंद्र राज्यभरात सुरु केलेले आहे. या शिवभोजन केंद्रांमुळे अनेक गरिबांची भूक भागविली जात आहे. पहिल्या टप्प्यात शिवभोजन केंद्र संख्या कमी होती. ती आता वाढविण्यात येत आहे. मात्र नवीन सुरु होणार्या शिवभोजन केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिंधींचे फ्लेक्स लावले जात आहे. त्यामुळे ही योजना सरकारची की स्थानिक लोकप्रतिनिंधींची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे ही केंद्रे आपल्या जवळच्याच माणसांना दिली जात आहेत. हे नव्याने मंजूर झालेल्या शिवभोजन केंद्रांवरील नेत्यांच्या फोटोवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते नाराज होत असून काहींनी याबाबत आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केलेल्या आहे. 

राज्यात आघाडी सरकार असल्यामुळे लोकप्रतिनिंधींनी आघाडीचा धर्मपाळून शिवभोजन केंद्रे वाटप करताना आघाडीतील आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर इतर पक्षातील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी आता सुरु झालेली आहे. त्यावरून काहींनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

शिवभोजन केंद्राची योजना सरकारची असून त्या केंद्रांवर आमदारांचे छायाचित्र असणे अयोग्य आहे, असे मत आता समाज माध्यमावर व्यक्त केले जात आहे. ही केंद्र गरिबांची भूक भागवणारी असून प्रसिध्दी मिळविण्यासाठी नाही. 

ज्यांना प्रसिध्दी मिळवायची आहे. त्यांनी गावागावत फ्लेक्स करून त्यातून नेत्याची व स्वता:ची प्रसिध्दी करून घ्यावी.  शिवभोजन केंद्रावरील फ्लेक्स काढून टाकावी, अशी मागणी काहींनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post