भुयारी मार्गाच्या प्रश्नासाठी रेल्वे रोको आंदोलन...


आरडगाव : राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या प्रश्नासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना व पूर्व भागातील पंधरा गावातील नागरिकांनी दिला आहे.

याबाबत रेल्वे प्रबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाचे काम अर्धवट झालेले आहे. रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. 

रेल्वे विभागाचे अधिकारी व सदर कामाचे ठेकेदार यांना भुयारी मार्गाच्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले जाईल म्हणून पाण्याचा निचरा होईल याचे काम आधी पूर्ण करावे याबाबत ग्रामस्थानी वेळोवेळी विनंती केली होती. मात्र त्यांनी हे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे याठीकाणी सध्या पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना वाहने चालविणे मुश्कील झाले आहे. 

पाऊस झाल्यानंतर वाहतूक बंद पडते त्यामुळे भुयारी मार्गाचे सर्व काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट पुन्हा सुरु करावे किंवा भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा होईल.

हे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा  १० जुलै २०२१ रोजी राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना व राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पंधरा गावातील नागरिक शासनाच्या कोविड बाबतचे सर्व नियम पाळून राहुरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करतील हा प्रश्न मार्गी न लागल्यास याची सर्व जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील, असेही म्हटले आहे. 

या निवेदनावर राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे, पत्रकार विनित धसाळ, अमोल पेरणे, ओंकार म्हसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

भुयारी मार्गाच्या प्रश्नासाठी सुरू केलेल्या या आंदोलनात पूर्व भागातील सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राहुरी तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post