शाळा सुरु झाल्याने कोरोनाच्या नेमणुका रद्द कराव्या... कोरोना मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना नोकरी द्या...


नगर : शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्या, कोरोनाने मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी व माध्यमिक शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

यावेळी संघटनेचे सचिव अप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, देविदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, संपत ढोकणे, एफ.एम. शेख, आर. एन. घोडके, पी. एफ. कार्ले, पी. डी. कडूस, ई. व्ही. बारगजे, बी. डी. धाडगे आदी उपस्थित होते.

माध्यमिक शाळांचे ऑनलाईन अध्यापनाचे काम सध्या सुरु झाले आहे. तरी देखील शिक्षकांना कोरोनाच्या नेमणुका देण्यात आलेले आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी शिक्षकांना काम करणे अशक्य आहे. 

कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये मयत झालेल्या शिक्षकांचे संसार उघड्यावर आले असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. 

माध्यमिक शिक्षकांचे पगार अनियमितपणे होत असल्याने कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक प्रश्‍न बिकट बनला आहे. कर्जाचे व इतर हप्ते वेळेवर न गेल्याने दंडाचा भुर्दंड बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्या असून, त्यांना कोरोनाच्या कामानिमित्त देण्यात आलेल्या नेमणुका रद्द कराव्या, कोरोनाने मयत झालेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी व माध्यमिक शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post