जनावरांचा बाजार सुरु व्हायला मुहूर्त कधीचा...


नगर ः
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये बाजार समित्यांमध्ये भरणारे बाजारही बंद करण्यात आलेले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच व्यवहार पूर्वपदावर आलेले आहे. मात्र जनावरांचा बाजार सुरु करण्याचा विसर प्रशासनाला पडलेला असून तो त्वरीत सुरु करावा, अशी मागणी आता शेतकर्यांमधून होत आहे. जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकर्यांना दुसर्यांकडून बैल आणून शेतातील मशागतीचे कामे करावी लागत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये सर्वच व्यवहार ठप्प झालेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्वरत सुरु करावे, यासाठी व्यापारी संघटनांनी प्रशासनाला निवेदने दिलेली होती. या निवेदनांचा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनीही केला होता. तसे निवेदनेही लोकप्रतिनिधींनी देऊन मागणी केली होती. याच लोकप्रतिनिधींना मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार बंद असून तो सुरु करण्याबाबत विसर पडलेला असल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आलेले असून अद्यापही ते बंद आहेत. या बंद बाजाराचा परिणाम शेतकर्यांचे मोठे नुकसान करणारा ठरत आहे. बंद बाजारामुळे शेतकर्यांना बैल, गाय, म्हैस, शेळ्या व मेंढया आदीची खरेदी विक्री थांबलेली आहे. सध्या खरिप हंगामाच्या पेरणीची कामे शेतकरी करीत आहे. अनेकजण मशागतीच्या कामासाठी बैलांचा वापर करतात.  याच काळात बैलाची खरेदी विक्री माेठ्या प्रमाणात होत असते. मात्र जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकर्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीही हीच परिस्थिती होती. यंदाही हीच परिस्थिती आहे. शेतकर्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील नेते आवाज उठवित नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुण्यात जनावरांचा बाजार भरतो कसा
पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तरीही पुणे जिल्ह्यात जनावरांचे बाजार सुरु आहे. मात्र नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असतानाही प्रशासन जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी का देत नाही, असा सवाल शेतकर्यांमधून केला जात आहे. पुण्यात एक व नगरमध्ये दुसरा नियम का असा थेट सवाल आता शेतकरी करू लागलेले आहेत. 
येथे भरतो बाजार
जिल्ह्यातील लोणी (ता. राहाता) येथे संकरीत गायांसाठी शेळ्या व मेंढ्यांचा स्वतंत्र बाजार भरतो. या बाजारात राज्यसह बाहेरील पाच राज्यातून व्यापारी गायी व शेळ्या, मेंढ्यांची खरेदी विक्रीसाठी येत असतात.  बैलांचीही विक्री या बाजार होत असते. विशेष म्हणजे जनावरांचा व शेळ्या मेंढ्या बाजार लोणी वेगवेगळ्या ठिकाणी भरतो.
घोडेगाव (ता. नेवासा) येथील म्हशीचा बाजार राज्यात प्रसिध्द असून येथे खऱेदीसाठी राज्यासह बाहेरील राज्यातून व्यापारी येत असतात. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील ः गाय व बैलांचा बाजार राज्यात प्रसिध्द आहे. येथेही राज्यासह बाहेरील राज्यातून व्यापारी येऊन जनावरांची खरेदी विक्री करीत असतात. यासह कोपरगाव, संगमनेर, बाेधेगाव येथेही जनावरांचे बाजार भरत असतात.
 
खुट्यावरील व्यवहारात गडबड
शेतकर्यांच्या घरी जाऊन अनेकजण जनावरांचा व्यवहार करीत आहेत. मात्र पडेल भावाने जनावरे खरेदी केली जात आहे. त्याचा परिणाम शेतकर्यांच्या उत्पन्नावर होत आहे. काही ठिकाणी जनावरांच्या खुट्यावर व्यवहार करून अर्धी रकम देऊन जनावरे घेऊन गेलेले व्यापारी परत शेतकर्यांना भेटलेले नाही. हे प्रकार टाळण्यासाठी आता जनावरांचे बाजार सुरु करण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post