दिव्यांगाच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम... सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती...


मुंबई : राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी राज्यभरात विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे आदेश आज दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जारी करण्यात आले आहेत. 

सामाजिक न्याय विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून ही मोहिम राबवणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पत्राद्वारे मुंडे यांना सूचना केली होती. त्या सूचनेवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.

सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील तातडीने सकारात्मक पावले उचलत आवश्यक निर्णय घेऊन आरोग्य विभागामार्फत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

ही लसीकरण मोहिम व्यापक स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवता यावी, याद्वारे प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीपर्यंत त्याची माहिती प्रसारित व्हावी, तसेच विनाव्यत्यय व कोविड विषयक संसर्गाचा धोका टाळून ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

याबाबतचा कृती आराखडा व मार्गदर्शक सूचना संबंधित दोनही विभागांकडून सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आल्या. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासन, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग यांनी समन्वयन करावयाचे आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रत्त्येक महानगरपालिका , जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आठवड्यातील एक दिवस दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात येईल किंवा शक्य असेल तिथे स्वतंत्र लसीकरण केंद्र , मोबाइल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येईल.

लसीकरण करण्याची तारीख व वार महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग तसेच दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत व्यापक प्रसिद्धी देऊन त्याची माहिती दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोचविण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post