पाथर्डी : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय 36) यांनी मंगळवार दुपारी एकच्या दरम्यान उपकेंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
डॉ. शेळके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेळके यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार व जिल्हाधिकारी हे आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या घटनेने जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
डॉ. गणेश शेळके हे उपकेंद्रात नेहमी प्रमाणे आले. काही वेळाने त्यांनी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिसगावला बोलावले आहे, असे सांगून ते तिसगावला गेले. तेथून काही वेळाने परत आले. ते परतले त्या वेळी तणावाखाली असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्या.
त्यानंतर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत सुद्धा काढली. या नंतर शेळके हे पेन व कागद घेऊन आले व टॅब जमा करा मी राजीनामा देणार आहे, असे सांगत ते उपकेंद्रातील दुसऱ्या खोलीमध्ये गेले. त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला.
काही वेळाने आरोग्य सेविकेने जेवणासाठी डॉक्टरला बाहेरून आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. या नंतर त्यांना मोबाइल केला मात्र तो शेळके यांनी न उचलल्याने आरोग्य सेविकेने खिडकीतून पाहिले असता डॉ. शेळके यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती आरोग्य सेविकेने तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कळवले. त्यानंतर तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून डॉ. शेळके यांचा मृतदेह काढला.
या वेळी डॉ . शेळके यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्या मध्ये शेळके यांनी आपल्या आत्महत्येस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे हे जबाबदार असून प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत . अतिरिक्त कामाचा ताण तसेच वेळत पगार नाही व पगार कपातीची धमकी यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Post a Comment