अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कोरोनाच्या प्रादुर्भावात गेल्या दीड वर्षापासून उत्कृष्ट कार्य केलेले आहे. या कामामुळे रुग्णांना जीवनदान मिळालेले आहे. सर्वच स्तरातून आरोग्य यंत्रणेचे कौतुक होत आहे. आरोग्य यंत्रणेचे सत्कार सोहळे होत आहेत. परंतु आढळगावातील त्या प्रकाराने शासकीय आरोग्य यंत्रणेच्या कामावर पाणी फेरले जात आहे. त्यामुळे आढळगावातील त्या प्रकाराची सखोल चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.
कोरोनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कोरोना तपासणी मोहिम हाती घेतलेली आहे. प्रशासनाने सर्वच शासकीय आरोग्य यंत्रणेला कोरोना तपासणी वाढविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना तपासणीने वेग घेतला आहे.
या तपासण्यांचा चांगला फायदा दिसून येत आहे. या तपासण्या व गावांचे परिश्रम यामुळे जिल्ह्यातील 821 गावे कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामकाजाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अधिकारी व कर्मचार्यांचे कोरोना योध्दे म्हणून सत्कार केले जात आहे. त्यामुळे कर्मचार्यांना कामास प्रोत्साहन मिळत आहे. या सर्व प्रयत्नांवर मात्र आढळगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी फेरल्याने सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी झाल्याची नोंद आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे. विशेष म्हणजे ही माहिती पोर्टलवर झालेली असून यावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही चूक झाली असेल सर्वांसाठी दिलासादायक बाब राहिल. पण जर तपासणीचा आकडा वाढविण्यासाठी हे नाव टाकले, असेल तर सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारा हा प्रकार ठरेल. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच तपासण्यांची चौकशी प्रशासनाला करावी लागणार आहे. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून नागरिक चर्चा करीत आहेत.
हा प्रकार गंभीर असून याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशीतूनच नेमकं काय घडले, हे स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहतली आहे. ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकाराची माहिती मिळाली आहे. या प्रकाराची चौकशी करणार आहे, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
Post a Comment