मधुकर म्हसे
राहुरी : संघ पत्रकारांच्या समस्याचे निराकरणासाठी कटीबद्ध असून संघाच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा देत संघाच्या सदस्यांच्या कुटुंबासाठी लवकरच आरोग्य शिबीर घेणार आहे, संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी केले.
मुळा धरण येथे झालेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
आढावा बैठकीची सुरुवात संघाचे दिवंगत सदस्य कैलास देठे यांना श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. पत्रकारांच्या सर्वांगीण प्रश्नी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची बांधिलकी असून पत्रकारांच्या प्रमुख समस्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघ प्रयत्नशील आहे.
त्याचाच भाग म्हणून कोविड काळात संघाचे दिवंगत सदस्य कैलास देठे यांच्या कुटुंबाला पूर्ववत उभे करण्यासाठी संघ पुर्ण ताकदीनिशी त्यांच्या बरोबर राहिला आहे.
जवळपास पंच्याहत्तर हजारांची मदत पत्रकारांनी देठे यांच्या कुटुंबाला केली असून आगामी काळातही या कुटुंबाबरोबर संघ असणार आहे. तर सर्व सदस्यांचा पाच लाखाचा आरोग्य विमा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने काढण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश बोरुडे, मनोज साळवे, अशोक मंडलिक, राजेंद्र म्हसे, मधुकर म्हसे, रहेमान शेख, सुभाष आग्रे,आर. आर. जाधव, राजेंद्र पवार, कमलेश विधाटे, शरद खिलारी, आप्पासाहेब घोलप उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश बोरुडे म्हणाले की , पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पत्रकारांनी अनेक राजकीय पुढाऱ्यांना सत्तास्थानावर बसविले. त्यांना प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर नेवून तालुक्यातील सत्तास्थाने काबीज करण्यात मोलाचा सहभाग दिला. परंतु कोविड काळात अनेक पत्रकार संक्रमित होत असताना या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
काही पत्रकारांचा यात दुर्दैवी अंत झाला.मात्र त्यांच्या कुटुंबाला साधी भेट घेवून सहानुभूती देण्याचे सौजन्य यांनी दाखविले नाही. यापुढील काळात सेवा संघ बळकट करुन पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सेवा संघाच्या माध्यमातूनच प्रयत्न करण्याचा संकल्प करावा लागणार आहे.
यावेळी सेवा संघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी बाळकृष्ण भोसले, सचिवपदी सुभाष आग्रे,कार्याध्यक्षपदी दीपक दातीर यांच्या निवडी झाल्या असल्याचे वाडेकर यांनी जाहीर करुन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. बैठकीसाठी बहुसंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment