कर्जत : कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानमध्ये केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून नगरपंचायतला राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे.
या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार आहे.
कर्जत नगरपंचायतने राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान (२०२०-२१)मध्ये भाग घेऊन नगर पंचायत व लोकसहभागातून पर्यावरण पूरक काम करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. यात नगरपंचायतला दोन कोटीचे बक्षीस मिळाले.
या बक्षीस रकमेच्या सहाय्याने शहरांमध्ये सात हरित उद्याने, सुसज्ज अशी रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे, शहरामध्ये यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, जुने आड बारव यांचे संवर्धन, माझी वसुंधरा अभियान दोन अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन आदी गोष्टींसाठी खर्च केला जाणार आहे.
आलेला संपूर्ण निधी शहराचा पर्यावरणीय आरोग्यासाठी व शहर हरित करण्यासाठी वापरला जाणार असल्याने शहराच्या पर्यावरणात येत्या वर्षभरात लक्षणीय बदल होणार आहे.
नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान दोन मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी पुन्हा एकदा हातभार लावायचा आहे.
माझी वसुंधरा अभियान एक मध्ये नगरपंचायत कर्जतने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. आता माझी वसुंधरा अभियान दोन (२०२१-२२) मध्ये मात्र कर्जत नगरपंचायत संपूर्ण नागरिकांच्या सहभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल असा विश्वास मुख्यधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला आहे
Post a Comment