नगर ः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख कधी कमी तर कधी जास्त असा होत आहे. सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी दिसून येत असली तरी तिसरी लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मंगळवारच्या तुलनेत जिल्ह्यात आज (बुधवारी) बाधितांची संख्या 97 ने घटली आहे. मात्र संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सध्या चढता व उतरता राहत आहे. जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 74, खासगी तपासणीत 117 व अॅंटीजेन चाचणीत 347 असे एकूण 538 बाधित आढळून आलेले आहेत. मंगळवारी बाधितांचा आकडा 635वर गेला होता. कालच्या पेक्षा आज बाधिताच्या आकड्यात घट झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
पारनेर तालुक्याला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाचे रुग्ण पारनेर तालुक्यात आढळून येत आहे. सध्या पारनेरमध्ये 78 रुग्ण आढळून आलेले आहेत.
नेहमीच पहिल्या स्थानावर असलेल्या पारनेर तालुक्याला संगमनेर तालुक्याने आज मागे टाकले आहे. संगमनेर तालुक्यात दिवसभरात 115 रुग्ण बाधित आढळले आहेत. दुसर्या क्रमांकाचे रुग्ण पारनेर तालुक्यात आढळले आहेत. तिसर्या स्थानी पाथर्डीतालुका असून पाथर्डीत दिवसभरात 71 बाधित आढळून आलेले आहेत.
नगर शहरात सध्या काळजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचा आकडा कमी झालेला असला तरी नगर शहरातील बाधितांचा आकडा वाढला आहे. नगर शहरात 27 जण बाधित आढळून आलेले आहेत.
Post a Comment