नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही कोरोनामुळे खुल्या सभेला राज्य सरकारकडून बंधन असल्याकारणाने पाच महिन्यापूर्वी 28 मार्च 2021ला ऑनलाईन पद्धतीने झाली होती. परंतु या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी संचालकांनी तब्बल तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावन्न रुपये खर्ची केले. एव्हढा मोठा खर्च होऊच कसा शकतो असा प्रश्न सर्वसामान्य सभासदांना पडला आहे. सभेच्या नावावर सभासदांच्या घामाचा व कष्टाचा पैसा कुठे रिचवला? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सहाणे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातत्याने सभासद हिताच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी नेत्याने एक प्रकारे ही सभासदांची आर्थिक लूटच केली आहे. या ऑनलाईन सभेला अकरा हजार पस्तीस सभासदांपैकी मोजक्याच लोकांना सहभागी होता येत होते. त्या बैठकीला एका वेळी 1000 सभासदांना सहभागी होण्याचे लिमिट होते.
मग या ऑनलाईन आभासी सभेवर लाखो रुपये खर्च दाखवून कोणाला खुश केले. हा सगळा प्रकार म्हणजे हजारो सभासदांच्या हक्काच्या पैशातून कार्यकर्ते सांभाळण्याचा प्रकार आहे. अशाने कार्यकर्ते सांभाळले जातील. परंतु येत्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासद मात्र तुमचा कडेलोट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास गणपत सहाणे यांनी व्यक्त केला.
कोरोना काळ असल्यामुळे आता तरी जनाच्या लाजेकाजे सभासद हित डोळ्यासमोर ठेवून चांगला कारभार करतील अशी अपेक्षा सभासदांना या भ्रष्ट सत्ताधारी बंडखोर गटाकडून होती. परंतु या घोटाळे बहाद्दरांनी त्यांच्या मास्टरमाइंड नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मात्र मुदत वाढीचा गैरफायदा घेत अनेक घोटाळ्यांची मालिका सुरु ठेवली आहे. यांच्या इथे सभासद हिताला थारा नाही, तर भ्रष्टाचराला थारा दिला जातो हेच पुन्हा एकदा सिद्ध केल आहे, असे सहाणे यांनी म्हटले आहे.
एकीकडे विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पण ऑनलाईन पद्धतीने त्याच वेळेस घेण्यात आली होती. त्यासाठी फक्त नऊ हजार रुपये खर्च आला. जेवढे बँकेचे सभासद आहेत. तेवढेच विकास मंडळाचे पण सभासद आहेत.
विकास मंडळाची सर्वसाधारण सभा ही रावसाहेब रोहोकले गुरुजींनी घालून दिलेल्या संस्कारातून विकास मंडळाचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त यांनी अत्यंत काटकसर करून सभासद हित जोपासले. खर्चाला फाटा देत अत्यंत सूक्ष्म नियोजन करून सभा कमी खर्चात पार पाडली. मग बँकेच्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेला लाखो रुपयांची उधळण कशासाठी? असा प्रश्न आता सर्वसामान्य सभासदांना पडला आहे.
मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सत्ताधारी संचालक मंडळाने विरोधी मंडळाच्या सभासदांचा आवाज दाबण्याचे काम केले. सर्व यंत्रणा त्यांच्या हातात असल्यामुळे मोजक्याच सत्ताधारी मंडळाच्या समर्थक सभासदांना बोलण्याची संधी दिली. काही सभासदांना बोलण्याची इच्छा असूनही त्यांना संधी या सत्ताधारी गटाकडून मिळाली नाही.
आता होऊ घातलेल्या दि. 29 ऑगस्टला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तरी सर्व सामान्य सभासदांना आपले मत मांडण्याची संधी मिळेल का नाही ? याची शंका सामान्य सभासद व्यक्त करू लागले आहेत. जर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाभर आंदोलन उभे करू, असा इशारा गणपत सहाणे, बाळासाहेब शेळके, तान्हाजी वाडेकर, भाऊसाहेब हासे, सुदाम धिंदळे, राजेंद्र भांगरे, राजू थोरात, बाळासाहेब बांबळे, संजय भोर, बहिरू जाधव, सदा आरोटे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
गेली सहा महिन्यापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन असताना आणि कोणतीही मोठी अहवाल छपाई केली नसताना तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे. यावर्षीची वार्षिक सभा देखील ऑनलाईनच आहे, परंतु केवळ छपाईच्या नावाखाली पैसे कमवण्यासाठी 12000 अहवाल छापण्यात आले आहेत. हे अहवाल छापण्याची आवश्यकता होती का? आणि या वर्षीचे छपाई अधिक ऑनलाइन सभा करता नक्कीच साडे पाच लाखाच्या पुढे अशी चिन्हे दिसत आहेत. सभासदांच्या घामाच्या पैशावर दिवसाढवळ्या दरोडे टाकण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू आहेत. - बाळासाहेब शेळके, जिल्हा सरचिटणीस, रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ, अहमदनगर

Post a Comment