नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी दि.२९ रोजी होत असून प्राथमिक शिक्षक बँकेत आठ टक्के कर्जव्याजदर आणि डिव्हिडंट मागणीसाठी शाखावार आंदोलन शनिवार अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाच्यावतीने संघटना व मंडळाचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखांवर करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करुन आठ टक्के करावा, नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँक निवडणूक ठराव घेण्यात यावा, गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणारा सभासदांचा लाभांश सभासदांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा, बँक निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघांमधून एका प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केली जाते. त्यामध्ये पोटनियम दुरुस्ती करून अनुसूचित जाती जमाती सभासदांना एक अतिरिक्त जागा संचालक म्हणून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
संचालकांची मुदत संपून एक वर्ष झाले आहे परंतु सत्तेची उब या संचालकांना सुटत नसून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने औरंगाबाद खंडपीठामध्ये एडवोकेट गुलाबराव राजळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
आतातरी संचालक मंडळाने खडबडून जागे व्हावे आणि आम्हाला सत्ता नको हे म्हणण्यासाठी उद्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या निवडणुकीचा ठराव करावा. एवढा कालावधी झाल्याने पोट आणि मन भरले असेल तर भ्रष्ट संचालक मंडळाने सत्तेतून पायउतार व्हावे.
सर्व संचालक मंडळाने राजीनामा दिल्यास बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल म्हणून सर्व संचालकांनी उद्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये आपला राजीनामा सभासदांच्या पुढे द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे आणि मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी जिल्ह्याच्या वतीने शिक्षक बँकेचे मुख्यालय येथे निवेदन देताना केली आहे.
सप्टेंबर 2021 पासून सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर (जामिनकी, घरकर्ज, प्रासंगिक व इतर) आठ टक्के करून सर्व कर्जदार सभासदांना न्याय देणे आवश्यक आहे. सध्याचा कर्ज व्याजदर जास्त असून, मुदतठेवी आणि कर्जव्याजदर यात खूप मोठी तफावत आहे. कर्जव्याजदर कमी करणे बँकेला सहज शक्य आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभापासून म्हणजेच 1 एप्रिल 2021 पासून कर्ज व्याजदर कमी करणे सहज शक्य होते. परंतु एप्रिल ते ऑगस्ट हे पाच महीने संपले तरीही , बँकेने काहीही केलेले नाही.
कर्जव्याजदर कमी करणे सहज शक्य आहे. दि. 1एप्रिल2021 पासून सर्व प्रकारच्या ठेवींवरील व्याजदरात आपण मोठी कपात केली आहे. म्हणजेच मुदत, सेव्हिंग, रिकरिंग ठेवी अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहेत. यामुळे नवीन येणाऱ्या ठेवी आणि नुतनीकरण होणाऱ्या ठेवींना कमी व्याजदर दिला जात असल्याने, बँकेला सध्या प्रचंड प्रमाणात नफा होत आहे, मात्र सामान्य सभासदांना मोठा भुर्दंड बसत आहे.
वर्षभर लॉकडाऊन असल्याने या वर्षी प्रशासकीय खर्चात बरीच कपात झालेली असेल. तसेच योग्य नियोजन करून यापुढेही प्रशासकीय खर्चात कपात करता येईल. आरबीआयच्या आदेशानुसार बँकेकडे सभासदांना वाटप करण्यास दिर्घकाळ प्रलंबित डीव्हीडंड वाटप तातडीने करावे. दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजीच डीव्हीडंड वाटप करण्याचे स्वयंस्पष्ट आदेश असताना बँकेने डीव्हीडंड वाटप याबाबत सभासदांना अंधारात ठेवले आहे.
शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपून बराच कालावधी झालेला आहे. प्रस्तावित वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक आयोजित करण्याचा ठराव विषयपत्रिकेत घेणे आवश्यक होते. ह्याबाबत बँकेकडून टाळाटाळ होत आहे, असा सभासदांचा समज झालेला आहे.
त्यामुळे तात्काळ सप्टेंबर 2021 पासून सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर 8.00 % करावा. आरबीआयच्या आदेशानुसार तिकडेकडे सभासदांना वाटप करण्यासाठी दिर्घकाळ प्रलंबित असलेले डीव्हीडंड वाटप तातडीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशीच करावे.
संचालक मंडळाची मुदत संपून बराच कालावधी झालेला आहे. प्रस्तावित वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक आयोजित करण्याचा ठराव मांडून मंजूर करण्याची शिफारस करावी. तसेच ऐनवेळच्या विषयात निवडणूक मतदारसंघ रचनेत अनुसूचित जाती आणि जमाती साठी दोन्ही मिळून एकूण फक्त एकच सदस्य घेतला जातो.
हे कार्यरत अनुसूचित जाती आणि जमाती सभासदांच्या प्रमाणात अन्यायकारक आहे. त्यामुळे निवडणूक ठराव करताना निवडणूक मतदारसंघ रचनेत अनुसूचित जाती आणि जमाती साठी दोन्ही मिळून एकूण दोन सदस्य घेतले जाण्याची सर्वसाधारण सभेला शिफारस करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सभासद हिताच्या मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात अन्यथा शिक्षक बँक मुख्य कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक गुरुमाऊली मंडळाने दिला आहे.

Post a Comment